Ad will apear here
Next
निसर्गरम्य सह्याद्रीची सफर
‘करू या देशाटन’ या सदरात आपण सध्या कोल्हापूर आणि आसपासच्या परिसराची भ्रमंती करत आहोत. कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेल्या निसर्गरम्य सह्याद्रीमधील पर्यटनस्थळांची माहिती आजच्या भागात घेऊ. 
...........
मागील भागातील लेखात आंबा घाटापर्यंतची सैर केली होती. या वेळी कोल्हापूरच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या परिसरात जाऊ. वारणा, पंचगंगा, कुंभी, कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्यांमुळे येथील निसर्गसौंदर्य खुलून दिसते. तसेच नदीकाठावर सुखसमृद्धी दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे आहेत. आंबा घाट, गगनबावडा, फोंडा घाट व आंबोली घाटामार्गे कोकणात व गोव्याकडे जात येते. निसर्गाने मुक्त उधळण केलेला हा प्रदेश बघताना मन हरखून जाते. गर्द हिरवीगार झाडी, त्यात दडलेले वन्यजीव, पावसाळ्यात कोसळणारे छोटे-मोठे धबधबे हे पाहण्यासाठी वेगळी ट्रिप नको. फोंडा घाटातून उतरलात, तर आंबा घाटाने वर जा. गगनबावड्याकडून गेलात, तर आंबोलीमार्गे वर या. कसेही गेलात तरी एक उत्तम सफर घडेल.

प्रयागतीर्थ (चिखली) : कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेले हे ठिकाण पंचगंगेचे उगमस्थान मानले जाते. उत्तर प्रदेशातील प्रयाग इतकेच याला महत्त्व आहे. कुंभी, कासारी, तुलसी आणि भोगावती व गुप्तपणे सरस्वती अशा पाच नद्यांपासून पंचगंगा होते. नरसोबाच्या वाडीजवळ पंचगंगा कृष्णेला जाऊन मिळते. पंचगंगेच्या काठावरच कोल्हापूर वसले आहे. कोल्हापुरात पुणे-साताऱ्याकडून येताना पंचगंगेचेच प्रथम दर्शन होते. 

गगनगिरी

गगनगिरी/ गगनबावडा :
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. जणू गगनात दिसणारा किल्ला, म्हणून गगनगिरी किंवा गगनबावडा असे नाव पडले असावे. कोल्हापूर-देवगड मार्गावर तीन हजार फूट उंचीवरील हे अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे. येथून कोकणात जाणारा घाटरस्ता फारच विलोभनीय दिसतो. फार पूर्वीपासून सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या मोक्याचे जागेवर तत्कालीन राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी नाकी उभारली होती. या किल्ल्याची निर्मिती भोजराजाच्या काळातील असावी. कोकणाकडे जाणारी वाट म्हणून प्राचीन काळापासून याचे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६०मध्ये हा किल्ला आदिलशाकडून घेतला. येथे नाथपंथीय लोकांचे देवस्थान असावे. येथे गगनगिरी महाराज यांचे आठ वर्षे वास्तव्य होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील सणबूर गावचे. ते चालुक्य वंशातील होते. त्यांनी भारतभ्रमण केले होते. बद्रीनाथ येथे त्यांनी नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरच्या जंगलात ते राहिले होते. तेथे त्यांनी योगसाधना केली. तसेच वनौषधींचा अभ्यासही केला. पुढे ते गगनगिरी किल्ल्यावर आले. तेथे त्यांचा मठ आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथेही त्यांचा पाताळगंगा मठ आहे. तेथेच त्यांचे चार फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले. 

पळसंबा येथील शिळाशिल्प

पळसंबा :
बौद्धकालीन अखंड शिळाशिल्प हे येथील वैशिष्ट्य. एका दगडात कोरलेले हे घराचे शिल्प बघण्यासारखे आहे. तसेच त्यात गुंफाही आहेत. पळसंबाजवळच रामचंद्रपंत अमात्य यांचा वाडा आहे. या वाड्यात ‘पछाडलेला’ व ‘काल रात्री बारा वाजता’ या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यांच्या वंशजांनी या ठिकाणी आता संग्रहालय उभारले आहे. रामचंद्रपंतांनी लिहिलेला ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ, मध्ययुगाच्या पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजनीतिशास्त्रावरील आणि विशेषतः शिवछत्रपतींच्या राजनीतीवरील एकमेव ग्रंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाईपुत्र छत्रपती शिवाजी महाराज व राजसबाईपुत्र छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूरकर) अशा पाच छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करण्याचा बहुमान रामचंद्रपंतांना मिळाला. त्यांना गगनबावड्याचे आसपासची गावे इनाम देण्यात आली होती. परिसरातील सांगशी येथील शिलालेख, गगनबावड्याच्या गुहा, आसळजचे वीरगळ, आरे-बीड पासून नजीकच्या परिसरात अनेक ठिकाणे संशोधनासाठी व अभ्यासासाठी महत्त्वाची आहेत. 

बारकी फॉल

बारकी फॉल :
हा धबधबा डोंगरकपारीत लपलेला आहे. कोल्हापूरहून साबळेवाडी कोपर्डेमार्गे किंवा पन्हाळा-आंबामार्गे या ठिकाणी जात येते; मात्र गाडी मार्ग शेवटपर्यंत नाही. हा धबधबा डोंगरकपारीत लपलेला आहे. 

अणुस्कुरा घाट

अणुस्कुरा घाट :
हा घाट कोकण आणि कोल्हापूरला जोडतो. सातवाहन काळापासून हा रस्ता रहदारीचा होता. या भागात जुने शिलालेखही आढळून येतात. राजापूरहून इंग्रजही या मार्गाने व्यापार करीत असत. तेव्हापासूनच दळणवळणाच्या दृष्टीने या घाटाला विशेष महत्त्व आले. घाटाच्या पायथ्याशी अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आदी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांची पुनर्वसन वसाहतही या घाटाच्या पायथ्याशीच वसविण्यात आली आहे. या घाटातील जंगलामध्ये वन्य जीवांचे वास्तव्य असून, बिबट्या, सांबर, गवा आदी प्राण्यांचा समावेश आहे. असंख्य नागमोडी, धोकादायक वळणे, उंच दगडी सुळके यामुळे हा घाट पार करताना छाती दडपून जाते. 

चक्रेश्वराचे मंदिर : २७८३ फूट उंचीवरील हे ठिकाण रात्रीच्या आकाश दर्शनासाठी उपयुक्त आहे. या ठिकाणाहून ४० किलोमीटर व्यासाचे आकाशदर्शन होऊ शकते. उल्कापात किंवा ताऱ्यांच्या अभ्यासासाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथील मंदिर पुरातन आहे . प्राचीन काळी नष्ट झालेल्या वसाहतीची निशाणी म्हणून शिस्तवर्तुळाची रचना केली जाते असे. अशा प्रकारची रचना येथे पाहायला मिळते. हे ठिकाण कोल्हापूरपासून तीस किलोमीटरवर आहे.

राधानगरी धरण : हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले आहे. कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराजांनी या धरणाच्या बांधकामाला सुरवात केली . १९०९ साली प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. वीजनिर्मिती व कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी हे धरण बांधण्यात आले. निधीअभावी रखडलेले काम १९५७मध्ये पूर्ण झाले. वनश्रीने नटलेला निसर्गरम्य परिसर यामुळे हे एक सहलीचे ठिकाण झाले आहे. हे धरण कोल्हापूरपासून ५५ किलोमीटरवर आहे.

दाजीपूर

दाजीपूर-राधानगरी अभयारण्य :
वनसंपदा व जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक वारसास्थळ असलेल्या या परिसरात राधानगरी, तुळशी आणि काळम्मावाडी असे तीन जलाशय जलसंपदेत भर घालत आहेत. त्यामुळे हा परिसर अधिक खुलून दिसतो. साताऱ्याच्या कास पठाराप्रमाणेच इदरगंजचा सडा (पठार) रानफुलांनी व्यापलेला पावसाळ्यात अनुभवता येतो. काळम्मावाडी धरणाची जागा छत्रपती शाहूमहाराजांनीच निश्चित केली होती. दूधगंगा आणि भोगावती नदीजोड प्रकल्पाचा यशस्वी प्रयोग धरणामुळे सहज शक्य झाला असून, नऊ टीएमसी पाणी भोगावती खोऱ्यात बोगदा (गॅबी बोगदा) करून वळवले आहे. दाजीपूर हे रानगव्यांचे मोठे वसतिस्थान आहे. 

दाजीपूर-राधानगरी अभयारण्य

भुदरगडभुदरगड : ३२१२ फूट उंचीवर हा प्राचीन किल्ला असून, शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला. हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा असून, सध्या सुस्थितीत आहे. भैरवनाथाचे प्रसिद्ध जागृत देवस्थान असून, येथे दर वर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७मध्ये स्वराज्यात आला. इ. स. १६६७मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला घेतला व त्याची दुरुस्तीही केली आणि लष्करी ठाणे उभारले. मुघलांनी हे ठाणे परत ताब्यात घेतले. पुन्हा पाच वर्षांनी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला करून मुघलांच्या प्रमुख सरदारास ठार केले व किल्ला जिंकून घेतला. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली. ती अजूनही देवळात पाहण्यास मिळतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून, त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात आला. इ. स. १८४४मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड हे प्रमुख होते. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगड पुन्हा ताब्यात घेतला. भैरवनाथाच्या मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे. येथे जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाड्यात गडसदरेचे अवशेष आहेत. वाड्याच्या पलीकडे करवीरकर छत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभामंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे. जवळच दूधसागर तलाव आहे. हा तलाव भुदरगडचे वैभव मानले जाते. किल्ल्यावरून दूधगंगा, वेदगंगेचे वनश्रीने नटलेले खोरे दिसते. हा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे ५०-५५ किलोमीटरवर आहे.

गारगोटी : हे भुदरगड तालुक्याचे मुख्यालय आहे. गार्ग्य मुनींच्या नावामुळे या गावाला गारगोटी नाव पडले असेही समजले जाते. त्याच पद्धतीने या गावातील लोकांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. ११ डिसेंबर १९४२ रोजी येथील खजिना लुटण्याच्या प्रयत्नावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात जणांना हौतात्म्य आले. इंग्रज राजवटीत सैनिकांच्या घोड्यांसाठी या ठिकाणी एक पागा होती. ही पागा इमारत आजही इतिहासाची ठळक निशाणी आहे. या इमारतीत शाहू महाराजांच्या काळापासून शाळा भरते. तसेच इंग्रज राजवटीत येथे कारागृह होते. या कारागृहांतील कैद्यांसाठी वेदगंगा नदीवर एक घाट आहे. तो आजही ‘कैदी घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. गारगोटी हे गाव शैक्षणिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गारगोटीच्या आसपास काही भागात बॉक्साइट ही खनिज संपत्ती आढळते. अलीकडच्या संशोधनात जिप्समचे साठेही डोंगररांगांत सापडले आहेत. याशिवाय शाडू, कौलांची - विटांची माती, काळे बेसॉल्ट व जांभा दगड येथे आढळतो. मौनी विद्यापीठ हे गारगोटीजवळील बहिरेवाडी गावाचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. जे. पी. नाईक यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले शैक्षणिक संकुल. बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण, तसेच पीएचडीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळणारे हे ग्रामीण भागातील एकमेव ठिकाण आहे. कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, स्थापत्य, संगणक, व्यवस्थाप शास्त्र असे सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी येथे मिळते. 

पाटगाव येथील मौनी महाराजांची समाधी

पाटगाव :
हे ठिकाण आध्यात्मिक, तसेच ऐतिहासिक आहे. मौनी महाराजांची येथे समाधी आहे. इ. स. १६७६मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. त्या वेळी महाराजांनी पाटगाव येथे जाऊन मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येईपर्यंत मौनी महाराज समाधिस्त झाले होते. दिनांक तीन जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्र भोजनासाठी सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात सुरुवात झाली होती. महाद्वार, सभामंडप, कोरीव खांबांच्या सजावटीसह ओवऱ्या, तसेच भद्रकालीचे मंदिर हे यथील वैशिष्ट्य. 

शिरसंगी येथील वटवृक्ष

शिरसंगी :
या गावात लक्षवेधी महाकाय वटवृक्ष आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हे ठिकाण आहे. याचा विस्तार एक एकरापेक्षा जास्त जागेवर झाला आहे. महाकाय या शब्दाचा अनुभव देणारा हा वटवृक्ष आहे. 

रांगणा किल्ला

रांगणा किल्ला :
राजा भोज दुसरा याने साधारण इ. स. ११००मध्ये हा किल्ला बांधला. समुद्रसपाटीपासून याची उंची २६०० फूट आहे. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. किल्ल्याची लांबी १६०० मीटर असून, रुंदी ९०० मीटर आहे. इ. स. १४७०मध्ये तो महंमद गावानने जिंकला. त्या वेळी ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला’ असे उद्गार महंमद गावानने काढले होते. त्यानंतर किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. त्याने सावंतवाडीच्या तो सोपविला होता. छत्रपती शिवरायांनी कोकणातील हा किल्ला परत घेतला. आदिलशहाने परत किल्ला घेतला, त्या वेळी महाराज आग्र्याला कैदेत होते. त्या वेळी स्वत: जिजाबाईंनी खास मोहीम काढून १५ ऑगस्ट १६६६ रोजी रांगणा जिंकला. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी सहा हजार होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. औरंगजेबालाही दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. इतर किल्ले खालून वर चढून जाता येतात. हा किल्ला मात्र दरीच्या एका टोकाकडून खाली उतरत यावे लागते. युद्धशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे प्रवेशद्वार परिसराची रचना आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे. या किल्ल्यावर इमारतीचे अवशेष दिसून येतात. बारमाही पाणी असलेला तलावही आहे. रांगणाई देवी, तसेच गणपतीचे मंदिरही येथे आहे. पदभ्रमण, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे कोल्हापूर, पाटगाव, तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. 

मनोहरगड /मनसंतोषगड : हा आंबोली मार्गावर आहे. महादेवगड फोडूनच आंबोली घाट बनविला आहे. माथ्यावर नारायणगड, पायथ्याशी मनोहरगड. या गडावर काहीही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही; मात्र हे पदभ्रमंती करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील दृश्य मनोहारी असते. घाटमाथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे प्रपात, खळखळणाऱ्या पाण्याचा नाद, सर्वच सुंदर. या ठिकाणी जाण्यासाठी पेठ शिवापूर आणि शिरशिंगेजवळच्या गोठवेवाडीतून रस्ता आहे. 

नेसरी

नेसरी :
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ हे कुसुमाग्रजांचे काव्य ऐकले, की अंगावर रोमांच उभे राहतात. त्या घटनेचे साक्षीदार असलेले हे गाव घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले हे स्थान आहे. येथे प्रतापरावांचा अश्वारूढ, आवेशयुक्त पुतळा बसवला असून, सभोवताली छोटे उद्यान विकसित केले आहे. सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहितीही येथे दिली आहे. तसेच शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळाही येथे आहे. 

प्रतापरावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारीमुंड्या चीत केले. खान शरण आला आणि तह केला. प्रतापरावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले... ‘स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका...’ प्रतापराव संधी शोधत होते. परंतु बेहलोलखान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती. कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर ‘तोंड दाखवू नका’ असा इशारा दिला होता. सरनोबत कात्रीत सापडले होते... हेच ते कुडतोजी गुजर ज्यांनी मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले. अखेर खान पुन्हा एकदा समोर आला आणि अवघ्या सात जणांनी खानाच्या छावणीवर हल्ला केला. या वेळी सात जणांना वीरगती आली. सात वीरांची नवे पुढीलप्रमाणे १) विसाजी बल्लाळ, २) दीपोजी राउतराव, ३) विठ्ठल पिलाजी अत्रे, ४) कृष्णाजी भास्कर, ५) सिद्धी हिलाल, ६) विठोजी शिंदे, ७) सरनोबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. 

पारगड (फोटो : क्षितिज संस्था)

पारगड :
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दक्षिण टोकावर असलेला कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील शेवटचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. इ. स. १६८९मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याला यश आले नाही. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. गडावर भवानीमातेचे मंदिर आहे. छोटासा पूर्णाकृती पुतळाही आहे. गडावर अनेक तलाव, विहिरी, तटबंदी, स्मारके दिसून येतात. पारगड चंदगडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. 

चंदगड : हे तालुक्याचं गाव आहे. तिलारीगड पॉइंट, ‘श्रीपादवाडी’ दत्तमंदिर ही येथील ठिकाणे. या ठिकाणी पावसाळी पर्यटन वाढू लागले आहे. इथे भातशेती, ऊस, नाचणी, तूर ही पिके आणि काजू, भुईमूग, नीलगिरी, फळभाज्या यांची लागवड केली जाते. आंबा, फणस, नारळ, सुपारी आदी परंपरागत झाडे आहेतच. काजूचे दहा-बारा कारखाने आहेत. येथील काजूला उत्तम चव आहे. 

(पुढील भागात माहिती घेऊ या कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाची...)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZIYBX
 पर्यटन स्थळांची खूपच छान माहिती आहे .
 अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण अन विस्तृत माहिती घाट आणि कोकणास जोडणाऱ्या किल्ल्यांचा आपण परिचय करून दिलात याबद्दल आभार !
Similar Posts
पन्हाळा आणि जोतिबा ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या दोन भागांत आपण कोल्हापूर शहरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. कोल्हापूरच्या जवळ असणाऱ्या पन्हाळा, जोतिबा अशा काही पर्यटनस्थळांची माहिती आजच्या भागात घेऊ या.
श्री महालक्ष्मीचे कोल्हापूर ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागापासून आपण महाराष्ट्रातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेणार आहोत. सुरुवात करू या कोल्हापूरपासून....
वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा जिल्हा : कोल्हापूर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या चार भागांत कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू हमरस्त्याच्या पश्चिम बाजूच्या काही पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात पूर्वेकडील काही पर्यटनस्थळांची माहिती घेऊ.
शिल्पसौंदर्याचा आविष्कार : खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या काही भागांत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. कोल्हापूरच्या समारोपाच्या भागात आज माहिती घेऊ या शिल्पसौंदर्याचा अनोखा आविष्कार असलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language